
रायगड, 24 जुलै, (हिं.स.) : शहापूर (ता. अलिबाग) येथील जमीन भूसंपादन मोबदल्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे ४३ लाख १५ हजार ३८ रुपयांचा मोबदला लाटल्याप्रकरणी पोयनाड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी तिघांसह काही शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी सुरू असून, या घटनेमुळे महसूल विभागातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील वाळकेश्वर येथील फिर्यादी यांनी सन २०२० मध्ये मौजे शहापूर येथील सर्व्हे क्रमांक ४१४/१, ४१४/३, ४२८/४-अ आणि ४२८/४-ब या जमिनींची कायदेशीर खरेदी केली होती. त्यानंतर सातबारा उताऱ्यावर नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असताना आरोपींनी संगनमत करून बनावट सी.सी. पावती तयार केल्याचा आरोप आहे. या पावतीच्या आधारे धेरंड औद्योगिक विकास क्षेत्रासाठी संपादित झालेल्या जमिनीचा ४३,१५,०३८ रुपयांचा भूसंपादन मोबदला मूळ शेतकऱ्यांच्या नावाने काढून त्याचा अपहार करण्यात आला.
फिर्यादी यांना मोबदल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाकडे चौकशी केली असता सातबारा उताऱ्यात फेरफार करून त्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८३/२०२६ नोंद करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील आरोपी क्रमांक १ व ४ यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३१८(४), ३१६(२), ३३८, ३३६(३), ३४०(२) व ६१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रिजवाना नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)