
रायगड, 24 जुलै (हिं.स.)। रिलेशनशिपमध्ये राहण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने महिलेचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग, मारहाण तसेच मोबाईलची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना पाली येथे घडली आहे. या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या बल्लाळेश्वर नगर, पाली येथील रहिवासी आहेत. या पूर्वी श्री बल्लाळेश्वर देवस्थान पार्किंग परिसरातून त्या पायी जात असताना नांदगाव, पोस्ट आतोणे, ता. सुधागड येथील आरोपीने मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग केला. त्याने फिर्यादीला रिलेशनशिपमध्ये राहण्याचा आग्रह केला. मात्र, त्यांनी स्पष्ट नकार दिल्याने संतप्त झालेल्या आरोपीने त्यांचा मोबाईल फोडून नुकसान केले.
यानंतर रात्री पाली येथील पोस्टमार्टम रूमसमोरील रस्त्यावरून फिर्यादी पायी जात असताना आरोपीने पुन्हा मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग केला. रस्त्यात मोटारसायकल आडवी लावून त्यांना अडविले व पुन्हा रिलेशनशिपमध्ये राहण्याची मागणी केली. नकार मिळताच त्याने शिवीगाळ करत फिर्यादीचा हात ओढून सोबत येण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कानाखाली मारहाण केली. फिर्यादी तेथून निघून जात असताना आरोपीने मोटारसायकलने मागून येत त्यांच्या कंबरेवर लाथ मारून मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १११/२०२६ अन्वये भारतीय दंड संहिता व भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जुंदरे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)