
रत्नागिरी, 25 जुलै (हिं.स.) । रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी, पालीतील वनपाल तसेच रत्नागिरी आणि जाकादेवीतील वनरक्षकांच्या मदतीने पोपटाची तस्करी करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले.
वन्यजीवांच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात रत्नागिरी वन विभागाने एक मोठी आणि धडक कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून वन्यजीव प्रजातीच्या पोपटाची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या एका आरोपीला वन विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. रत्नागिरी परिसरात वन्यजीव पोपटाची विक्री व तस्करी होणार होती. या माहितीच्या आधारे विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाने तातडीने कारवाईदरम्यान संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. गुफरान निसार फणसोपकर असे त्याचे नाव असून हा आरोपी जुना फणसोप येथील रहिवासी आहे. त्याच्या ताब्यातून दुचाकी, मोबाइल आणि ६ पोपट ताब्यात घेतले.
आरोपी विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या पोपटांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वन्य जीवांची शिकार करणे, त्यांना पकडणे किंवा त्यांची बेकायदेशीर विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही बेकायदेशीर कृत्याची माहिती मिळाल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा. तसेच वन्यजीव संरक्षणात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रत्नागिरी परिक्षेत्र वनाधिकारी विक्रम गुरव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी