जलसंपदा विभागात शेतकऱ्यांसाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन करणार - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
कोल्हापूर, 26 जुलै (हिं.स.)। ज्या ज्या ठिकाणी पाण्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचा संबंध येतो अशा जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया येत्या महिनाभरात ऑनलाईन करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विक
कृष्णा खोरे जलसंपदा विभाग कोल्हापूर  विभागीय कार्यालयाचे उद्घाटन


कोल्हापूर, 26 जुलै (हिं.स.)। ज्या ज्या ठिकाणी पाण्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचा संबंध येतो अशा जलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया येत्या महिनाभरात ऑनलाईन करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात महाराष्ट्र कृष्ण खोरे विकास महामंडळ पुणे अंतर्गत मुख्य अभियंता (ज. सं) कृष्णा खोरे जलसंपदा विभाग कोल्हापूर येथील विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

व्यासपीठावर राज्याचे आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ.राजेश क्षीरसागर महापौर रूपाराणी निकम आदी प्रामुख्याने उपस्थित होते. विखे पाटील म्हणाले , कृष्णा व गोदावरी खोरे महामंडळाची सुमारे 56 हजार एकर जमीन जलसंपदा विभागाने स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. यासाठी कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून भविष्यात राज्यामधील दुष्काळी भागातील पाणी विषमता दूर करण्याला जलसंपदा विभाग प्राधान्य देणार असल्याचे सांगितले .जलसंपदा विभागाचे अधिकारी धरणाच्याच ठिकाणी कार्यरत राहतील याचे नियोजन सुरू असल्याचेही ते म्हणाले त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा खऱ्या अर्थाने सहकाराची भूमी असल्याचेही प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी विखे पाटील यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला .

पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले,या विभागाने काळमवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला मान्यता देवून या धरणाच्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेच्या (सुप्रमा) अनुषंगाने त्वरीत येथील कामकाजाला प्रारंभ करण्यात यावा. कोल्हापूर शहरातील ब्ल्यू व रेड लाईनबाबत ठोस असा निर्णय व्हावा. त्याचबरोबर अलमट्टी धरणाच्या अनुषंगाने जे सातत्याने उभे राहणारे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जलसंपदा विभागाने सर्वोच्च न्यायालयातील वकिलांशी बोलावे अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. खा.धनंजय महाडिक म्हणाले,कोल्हापूरात जरी मुबलक पाणीसाठा असला तरी जिल्ह्यात अनेक सूक्ष्म प्रकल्पांची आवश्यकता आहे.त्याची उभारणी करण्यात यावी.शेतकऱ्यांमध्ये शेतीसाठी लागणाऱ्या पाणी वापराबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची कोणत्याही परिस्थितीत वाढता कामा नये यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहेत.

यावेळी खासदार महाडिक यांनी हे कार्यालय कोल्हापूरला दिल्याबद्दल विखे पाटील यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.याप्रसंगी धुमाळ यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले .

हे कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित न्याय मिळेल.तसेच त्यांच्या प्रश्नांचे निराकरण होईल .या जिल्ह्यात जलसंपदा विभाग हा जल व्यवस्थापनाला कायम प्राधान्य देईल असे मुख्य अभियंता (ज सं) अलका अहिरराव आपल्या प्रस्ताविकात म्हणाल्या. या विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत सांगली सातारा व कोल्हापूर जिल्हे कार्यरत राहणार आहेत.तत्पूर्वी विखे पाटील यांनी सिंचन भवन येथील अद्यावत अशा जलसंपदा विभागीय कार्यालयाची पाहणी करून त्या ठिकाणी वृक्षारोपण केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande