
बीड, 26 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य ग्रामीण नर्सेस संघटना, बीड यांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांची भेट घेऊन आरोग्य सेविका (ANM) यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर केले. ग्रामीण भागातील माता-बालकांचे आरोग्य, लसीकरण, कुटुंब कल्याण, संसर्गजन्य रोगांचे प्रतिबंध तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी घराघरापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आरोग्यसेविका करत आहेत. आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या या कर्मचाऱ्यांना आजही अनेक मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत असून, त्यांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
संघटनेने सादर केलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
- ANM पदनाम बदलून ग्राम आरोग्य अधिकारी असे करण्यात यावे.
- वेतनातील विसंगती दूर करून ANM कर्मचाऱ्यांना न्याय्य वेतनश्रेणी तसेच वेतन आयोगाचे सर्व लाभ लागू करण्यात यावेत.
- राज्यातील सर्व रिक्त ANM पदे तातडीने भरून विद्यमान कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करण्यात यावा.
- प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक संख्येने ANM पदे निर्माण करून भरती करण्यात यावी.
- दीर्घकाळ सेवा देणाऱ्या ANM कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या समान संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात.
- ग्रामीण आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्यसेविकांच्या सर्व मागण्यांचा शासनाने सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा.
यावेळी आमदार संदीप क्षीरसागर यांनी आरोग्यसेविका भगिनींच्या मागण्या रास्त असून त्या केवळ कर्मचाऱ्यांच्या हिताच्या नसून ग्रामीण नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असल्याचे सांगितले. या सर्व मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. आरोग्यसेविका भगिनींच्या न्याय्य हक्काच्या लढ्यात मी त्यांच्यासोबत ठामपणे उभा आहे, अशी भूमिका आमदार संदीप क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis