
लातूर, 26 जुलै (हिं.स.)राज्य उत्पादन शुल्क विभागाने लातूर व धाराशिव जिल्ह्यात बनावट मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ८ आरोपींना अटक केली असून, तीन चारचाकी वाहनांसह सुमारे ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे आणि नांदेड विभागाचे विभागीय उपआयुक्त डॉ. बी. एच. तडवी यांच्या निर्देशानुसार लातूरचे अधीक्षक युवराज गोशिनाथ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
यापूर्वी २३ जुलै रोजी लातूर, निलंगा व चाकूर विभागाच्या संयुक्त पथकाने अवैध मद्यवाहतुकीप्रकरणी तीन आरोपींना अटक केली होती. त्यानंतरच्या तपासात खंडापूर (जि. लातूर) आणि येणेगुर (ता. उमरगा, जि. धाराशिव) येथील बनावट मद्यनिर्मिती व विक्री केंद्रांचा पर्दाफाश झाला. पुढील तपासात आणखी आरोपींना अटक करण्यात येऊन एकूण अटक आरोपींची संख्या आठवर पोहोचली.
कारवाईदरम्यान स्विफ्ट, इर्टिगा आणि फॉक्सवॅगन व्हेंटो या तीन चारचाकी वाहनांमधून बनावट विदेशी मद्य, गोवा निर्मित व्हिस्कीच्या बाटल्या, रिकाम्या बाटल्या, बुचे, इसेन्स, प्लास्टिक बॅरल, मद्यनिर्मितीचे साहित्य तसेच मोबाईल फोन असा मोठा साठा जप्त करण्यात आला. तपासात हा मद्यसाठा खंडापूर व येणेगुर येथील ठिकाणांहून पुरविला जात असल्याचे निष्पन्न झाले.
या संपूर्ण कारवाईत एकूण ३०,००,२८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक जी. व्ही. साळवे करीत आहेत. या मोहिमेत अधीक्षक युवराज राठोड यांच्यासह उपअधीक्षक, निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, जवान तसेच पोलीस विभागाच्या सायबर शाखेतील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असून, धाब्यांवर मद्यसेवनास परवानगी देणाऱ्या धाबा चालकांवरही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अधीक्षक युवराज राठोड यांनी दिला आहे. नागरिकांनी अवैध मद्याबाबतची माहिती टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉट्सऍप क्रमांक ८४२२००११३३ वर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis