
१५ धरणांमधून ९२ हजार २३३ क्युसेक पाण्याचा विसर्ग
नाशिक, 26 जुलै (हिं.स.)। जून महिना कोरडा गेल्यानंतरही वरुणराजा चांगलाच बरसल्याने पावसाळ्याच्या माध्यवरच जिल्ह्यातील बहुतांश धरणे काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच पुढील वर्षभराचा शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सुटला आहे. त्याचप्रमाणे शेतात असलेल्या विहीरी आणि बोअरवेललादेखील मुबलक पाणी असल्याने खरिप हंगाम चांगलाच बहरणार असल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान मागील वर्षीदेखील चांगले पर्जन्यमान होऊनही विहीरींनी तळ गाठल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तर काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. परंतु जिल्ह्यातील २६ धरणे मिळून ५५ हजार ८३१ दलघफु जलसाठा निर्माण झाला असून त्याची टक्केवारी ७९.०६ इतकी आहे. त्यामुळे पिण्याबरोबरच शेती आणि उद्योगांनाही मुबलक पाणी मिळणार आहे.
नाशिककरांना दिलासा
मागील वर्षी धरणे भरूनही अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागले. आता चालू वर्षी या भागातील धरणांमध्ये वर्षभर पुरेल इतका जलसाठा निर्माण झाल्याने यंदा टँकरची गरज भासण्याची शक्यता कमी आहे. त्यातच नाशिक शहराची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरण समुहामध्ये ८८.२० टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. तर एकट्या गंगापूर धरणामध्ये सद्यस्थितीत ८४.५१ टक्के इतका उपयुक्त जलसाठा आहे. या जलसाठ्यातून पुढील वर्षाचीही नाशिकची तहान भागविली जाणार आहे.
शेतीला वर्षभर पाणी शक्य
नाशिक जिल्ह्यात शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्ग वर्षभर आपल्या शेतात वेगवेगळी पिके घेत असतो. यामध्ये निफाड, दिंडोरी आणि नाशिक तालुक्याच्या काही भागात द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. तर चांदवड, कळवण, येवला, सिन्नर या तालुक्यांमध्ये कांदा आणि मका तर बागलाण तालुक्यात कांदा पिकाबरोबरच डाळिंबाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. मागील वर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील शेती धोक्यात आली होती. मात्र यंदा वरुणराजाच्या कृपेने जिल्हा वर्षभर हिरवागार राहण्यास मदत होणार आहे.
बऱ्याचशा धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा
नाशिक जिल्ह्यातील २६ धरणांपैकी बऱ्याचशा धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा निर्माण झाला आहे. त्यात कायम दुष्काळी तालुक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आश्वासक जलसाठा आहे. त्यामुळे या तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतीलाही संजिवनी मिळणार आहे.
सध्या धरणांतील जलसाठा आणि विसर्गाची स्थिती पुढीलप्रमाणे :
गंगापूर धरण ८४.५१% भरले असून ४,४१० क्युसेक विसर्ग सुरू आहे. काश्यपी ९२.१२% (५०० क्युसेक), गौतमी गोदावरी ८९.९४% (५०० क्युसेक), आळंदी १००.७४% (विसर्ग नाही), पालखेड ५८.८१% (४,९५६ क्युसेक), करंजवण ७०.३१% (विसर्ग नाही), वाघाड ८८.०५% (विसर्ग नाही), ओझरखेड १००% (२,६३७ क्युसेक), पुणेगाव ६६.७७% (१,५६८ क्युसेक), तिसगाव ७५.३८% (विसर्ग नाही), दारणा ८७.५८% (८,८५८ क्युसेक), भावली १००% (९४८ क्युसेक), मुकणे ५९.२६% (विसर्गाची नोंद उपलब्ध नाही), वालदेवी १००% (१,५८९ क्युसेक), कडवा ८२.८८% (२,९६४ क्युसेक), नांदूरमध्यमेश्वर येथून ४९,०६६ क्युसेक विसर्ग सुरू असून जलसाठ्याची टक्केवारी उपलब्ध नाही, वाकी ५८.६७% (विसर्ग नाही), भाम १००% (२,०१७ क्युसेक), भोजापूर १००% (६८७ क्युसेक), चणकापूर ८०.२२% (७,५९१ क्युसेक), हरणबारी १००% (२,५८८ क्युसेक), केळझर १००% (१,३६४ क्युसेक), नागासाक्या ०.५०% (विसर्ग नाही), गिरणा ७७.५६% (विसर्ग नाही), पुनद ७२.३३% (विसर्ग नाही) आणि माणिकपुंज ०.८५% भरले असून तेथूनही सध्या कोणताही विसर्ग सुरू नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV