
अमरावती, 26 जुलै (हिं.स.)
स्थानिक वॉर्ड चारमधील लामखाडे प्लॉट परिसरातील खचलेली विहीर रहिवाशांसाठी धोकादायक ठरत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायतने तातडीने विहिरीभोवती टीनपत्र्यांचे संरक्षणात्मक आवरण उभारून नागरिकांना त्याठिकाणी जाण्यास मनाई केली होती. मात्र, त्यानंतर तब्बल वर्षभर उलटूनही विहीर कायमस्वरूपी बुजविण्याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने तिचा व्यास वाढत असून परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जठानपूर रस्त्यालगत असलेल्या लामखाडे यांच्या मालकीच्या शेतात ही विहीर होती. पुढे त्या शेताचे ले-आउटमध्ये रूपांतर झाल्यानंतर रहिवाशांसाठी तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या मध्यभागीच ही विहीर राहिली. त्यावेळी ले-आउट विकसित करताना विहीर बुजविणे किंवा रस्त्याचे नियोजन सुरक्षित पद्धतीने करणे आवश्यक होते. मात्र तसे न झाल्याने ही समस्या कायम राहिली. दरम्यान, प्लॉटधारकांनी घरे बांधल्यानंतर विहिरीसमोरील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण झाले. परिणामी, रहिवाशांच्या वापरासाठी असलेला रस्ता विहिरीजवळच संपुष्टात आला आणि तो दुर्लक्षित झाला. त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे विहिरीचा कडा खचला. विहिरीच्या तोंडाभोवतीची जमीन भुसभुशीत झाल्याने तिचा व्यास दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याच्या परिस्थितीत आणखी मुसळधार पाऊस झाल्यास लगतच्या घरांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतने तातडीने विहीर कायमस्वरूपी बुजविण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
एका वृत्तानंतर ग्रामपंचायतने तात्पुरत्या उपाययोजनेच्या स्वरूपात टीनपत्र्यांचे संरक्षणात्मक आवरण उभारले. मात्र, त्यानंतर एक वर्ष उलटूनही विहीर बुजविण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. उलट विहिरीचा व्यास वाढत असल्याने धोका अधिकच तीव्र झाला आहे. एखादी अप्रिय घटना घडल्यानंतरच ग्रामपंचायत जागी होणार का?, असा संतप्त सवाल परिसरातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
----------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी