
पुणे, 26 जुलै (हिं.स.)शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाने रखडलेल्या मिसिंग लिंक रस्त्यांची कामे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. चालू वर्षात शहरातील १२ महत्त्वाच्या मिसिंग लिंक रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
शहरातील अनेक प्रमुख भागांमध्ये भूसंपादन आणि इतर तांत्रिक कारणांमुळे रस्त्यांची कामे अपूर्ण राहिली आहेत. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र झाली आहे. हे रखडलेले रस्ते जोडल्यास वाहतुकीचा प्रवाह सुरळीत होण्यास मदत होईल, वाहनचालकांचा प्रवासाचा वेळ कमी होईल आणि शहरातील वाहतूक कोंडीवरही मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल, असा महापालिकेचा विश्वास आहे. महापालिकेच्या म्हणण्यानुसार, प्राधान्यक्रम ठरवून यंदा १२ मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असून, त्यांची प्रत्यक्ष कामे येत्या काही दिवसांत सुरू होणार आहेत.
दरम्यान, पुणे महापालिकेने ऑगस्ट २०२२ मध्ये विकास आराखडा (डीपी) तसेच नव्याने महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांच्या प्रादेशिक विकास आराखड्याच्या (आरपी) अनुषंगाने शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण केले होते. या पाहणीत भूसंपादनासह विविध कारणांमुळे अनेक महत्त्वाचे रस्ते अपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या मिसिंग लिंक रस्त्यांना जोडण्याचा निर्णय पथ विभागाने घेतला होता. आता या प्रकल्पांना पुन्हा गती देण्यात येत असून, शहरातील वाहतूक व्यवस्थेला त्याचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु