पुणे विद्यापीठाचा परीक्षा विभाग पुन्हा वादात; निकाल रखडल्याने विद्यार्थी आक्रमक
पुणे, 26 जुलै (हिं.स.)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एप्रिल २०२६ मध्ये घेतलेल्या बी.ए. आणि बी.कॉम. पदवी परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. परीक्षा होऊन जवळपास तीन महिने उलटूनही निकाल जाहीर न झाल्
University Pune SPUU


पुणे, 26 जुलै (हिं.स.)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एप्रिल २०२६ मध्ये घेतलेल्या बी.ए. आणि बी.कॉम. पदवी परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. परीक्षा होऊन जवळपास तीन महिने उलटूनही निकाल जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, एप्रिलमध्ये परीक्षा पूर्ण झाल्यानंतरही निकाल जाहीर करण्यास इतका विलंब का होत आहे, याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतेही स्पष्ट किंवा समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. परीक्षा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

निकालाच्या विलंबाचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसत आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी तसेच शासकीय आणि खासगी क्षेत्रातील नोकरीसाठी अर्ज करताना अंतिम वर्षाचा निकाल आवश्यक असल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षण आणि रोजगाराच्या संधी धोक्यात आल्या आहेत.

विद्यार्थी प्रतिनिधींनी परीक्षा संचालकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, पुढील दोन दिवसांत निकाल जाहीर न झाल्यास परीक्षा विभागासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित हा प्रश्न गांभीर्याने हाताळून विद्यापीठ प्रशासनाने तातडीने निकाल जाहीर करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande