वर्धा-११० कोटींचा आष्टी-कारंजा सिमेंट रस्ता अर्धवट, वाहनचालकांची जीवघेणी कसरत
वर्धा 27 जुलै (हिं.स.)आष्टी आणि कारंजा (घा.) या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण मार्गाच्या कामासाठी ११० रुपये खर्च करण्यात येत असतानाही रस्त्याचे काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. अर्धवट बांधकाम, रस्त्यावर साचलेला चिखल आणि निर्माण झालेले जी
११० कोटींचा आष्टी-कारंजा सिमेंट रस्ता अर्धवट वाहनचालकांची जीवघेणी कसरत


वर्धा 27 जुलै (हिं.स.)आष्टी आणि कारंजा (घा.) या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण मार्गाच्या कामासाठी ११० रुपये खर्च करण्यात येत असतानाही रस्त्याचे काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. अर्धवट बांधकाम, रस्त्यावर साचलेला चिखल आणि निर्माण झालेले जीवघेणे खड्डे यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे.

पावसामुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली असून अनेक ठिकाणी चिखलामुळे वाहनांचे नियंत्रण सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्यावर माती पसरलेली असल्याने वाहनचालकांना घसरगुंडीचा सामना करावा लागत आहे. दुचाकीस्वारांसह चारचाकी आणि अवजड वाहनचालकांनाही या मार्गावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक वाहने चिखलात अडकत असून काही वाहनांमध्ये बिघाड होण्याच्या घटनाही घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जांब नदीवरील पुलाचे बांधकामही संथगतीने सुरू असल्याने या मार्गावरील वाहतुकीच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

रस्त्याचे काम अर्धवट सोडून ठिकठिकाणी बांधकाम साहित्य आणि मातीचा भराव करण्यात आल्याने पावसाच्या पाण्यामुळे संपूर्ण मार्ग चिखलमय झाला आहे. पारडी गावाजवळील दोन जुन्या पुलांचे बांधकाम अद्याप करण्यात आले नसल्याने या मार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत आणि नियोजनाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बोटोणा गावात कमळगीर मंदिर व जिल्हा परिषद शाळा परिसरात मोठी नाली खोदून ठेवली. त्यामुळे येथील शाळेत पाणी साचले. एका बाजूने सिमेंट नाली बांधली, तर दुसऱ्या बाजूने नाली बांधली नाही. गट्ट लावण्यासाठी जागा सोडली, ती जागा अपघात घडण्याचे स्थळ होत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असताना नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाची सुविधा मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

कोट्यवधींचा निधी खर्च करूनही नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेली ही कसरत कधी थांबणार, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. थार येथील प्रफुल्ल उईके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी करून चौकशी करावी व दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.--------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande