
किनगाव राजा, 27 जुलै (हिं.स.) : पुढील दोन दशकांत हवामानातील अनिश्चितता वाढणार असून, पारंपरिक शेतीसोबत वैज्ञानिक नियोजन स्वीकारल्याशिवाय शेती टिकणार नाही. प्रत्येक थेंब पाण्याचे संवर्धन, बदलत्या पावसाच्या स्वरूपानुसार पीकनियोजन आणि शेतकऱ्यांची संघटित ताकद हेच भविष्यातील शेतीचे आधारस्तंभ ठरणार आहेत, असा दूरदृष्टीचा संदेश प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला.
लोकशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते.
व्याख्यानात पंजाबराव डख यांनी २०२६ ते २०५० या कालावधीतील हवामानातील संभाव्य बदलांचा सखोल आढावा घेतला. बदलते पावसाचे स्वरूप, जलव्यवस्थापन, पीकपद्धती आणि शेतीच्या दीर्घकालीन नियोजनाविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील गावरान आंबा, लिंबोळी आणि इतर नैसर्गिक संकेतांच्या आधारे हवामानाचा अंदाज बांधण्याच्या पारंपरिक पद्धतींची वैज्ञानिक बाजूही त्यांनी उलगडून सांगितली. तसेच गारपीट, अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलांचा शेतीवर होणारा परिणाम स्पष्ट केला.
यावेळी बोलताना त्यांनी, जोपर्यंत शेतकरी संघटित होत नाही, तोपर्यंत त्याला न्याय्य भाव आणि सन्मान मिळणे कठीण आहे, असे ठाम मत व्यक्त करत शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बाळाजी सोसे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तसेच विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार ऋषिकेश देशमुख यांनी मानले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी