
अमरावती, 27 जुलै (हिं.स.)| ग्रामीण पोलीस दलाने संघटित गुन्हेगारीविरोधात अत्यंत प्रभावी आणि कठोर पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र शासनाचा ‘मोक्का’ कायदा जसा संघटित गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालतो, अगदी त्याच धर्तीवर नवीन भारतीय न्याय संहिता ‘बीएनएस’ २०२३ मधील कलम १११ चा वापर करत अमरावती ग्रामीण पोलिसांनी परतवाडा पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील दहा आरोपींविरूद्ध ऐतिहासिक कारवाई केली आहे. नवीन कायदा लागू झाल्यापासून अमरावती ग्रामीण घटकातील ही पहिलीच धडक कारवाई ठरली आहे.
१९ मे रोजी बेलज फाट्यावर राजेंद्रसिंग किसनसिंग बावरी (३२, रा. मोर्शी) यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी २० मे रोजी अमनसिंग बावरी व अन्य नऊ जणांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत तब्बल ८ जणांना बेड्या ठोकल्या. पोलीस अधीक्षकांनी या सर्व आरोपींचा पूर्व अभिलेख तपासला असता, हे सर्वजण टोळीने गुन्हे करत असल्याचे उघड झाले. यातील नऊ आरोपी हे बावरी कुटुंबातील सदस्य आहेत. टोळीप्रमुख व त्याचे सदस्य कोणतीही नोकरी किंवा धंदा न करता केवळ उपजीविकेसाठी आणि आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी चालवत होते. या टोळीविरुद्ध यापूर्वी खूनाचा प्रयत्न, बेकायदेशीर मंडळी जमवून सरकारी नोकरावर हल्ला, दुखापत, शिवीगाळ व धमकी देणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारीत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी ही टोळी सक्रिय होती.
परतवाड्याच्या ठाणेदारांनी या टोळीविरूद्धच्या कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्याकडे सादर केला. पडताळणीनंतर अधीक्षकांनी या टोळीविरुद्ध बीएनएसच्या कलम १११ नुसार कारवाईचा अंतर्भाव करण्यास अधिकृत मंजुरी दिली. बीएनएस कलम १११ ही संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अत्यंत प्रभावी तरतूद आहे. याद्वारे टोळीची कार्यपद्धती, त्यांचे आर्थिक हितसंबंध, गुन्ह्यांचे सातत्य आणि गुन्हेगारी जाळ्याचा सखोल तपास करणे शक्य होणार आहे. स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, परतवाड्याचे ठाणेदार अजय आकरे, उपनिरीक्षक विशाल रोकडे, हवालदार अमोल देशमुख व दिनेश राठोड यांनी ही कारवाई केली.
जिल्ह्यात गुन्हेगारी, खंडणी, दहशत निर्माण करणाऱ्या आणि बेकायदेशीर वर्चस्व प्रस्थापित करू पाहणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करण्यासाठी ग्रामिण पोलिस कटिबद्ध आहेत. बीएनएस लागू झाल्यानंतर ग्रामिण घटकातील ही पहिलीच कारवाई आहे असे पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी