


तहसीलदारांनी दिले शेतकऱ्यांच्या नुकसन पंचनाम्याचे आदेश
इगतपुरी, 27 जुलै (हिं.स.) : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी परिसरात सह्याद्री पर्वतरांगांतील डोंगराचा काही भाग खचल्याने दगड, गोटे, मुरूम व माती मोठ्या प्रमाणावर खाली कोसळली. यामुळे वनपट्टेधारक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानीचा तातडीने पंचनामा करण्याचे आदेश इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, हरसूल, पेठ तसेच नाशिक व निफाड परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे सह्याद्री पर्वतरांगांतील काही भाग खचल्याने मोठ्या प्रमाणावर मुरूम, माती, दगड आणि गोटे शेतजमिनींमध्ये वाहून आले आहेत. त्यामुळे वनपट्टेधारक शेतकऱ्यांनी तयार केलेल्या शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
सोमवारी तहसीलदार अभिजित बारवकर यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसह आंबेवाडी परिसराची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या.
-------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV