नेरळमध्ये दूषित पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण
रायगड, २७ जुलै (हिं.स.) : नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांना पाणीटंचाईबरोबरच दूषित पाणीपुरवठ्याचाही सामना करावा लागत आहे. अनेक भागांत नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे,
नेरळमध्ये दूषित पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण


रायगड, २७ जुलै (हिं.स.) : नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांना पाणीटंचाईबरोबरच दूषित पाणीपुरवठ्याचाही सामना करावा लागत आहे. अनेक भागांत नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे, तर नळातून गढूळ, मातीमिश्रित आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ऐन पावसाळ्यातही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मिळणारे पाणीही पिण्यायोग्य नसल्याने ते गाळून व उकळून वापरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. अनेक घरांमध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण असल्याने दूषित पाण्यामुळे अतिसार, कावीळ, टायफॉईड आणि गॅस्ट्रोसारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही ठोस उपाययोजना झालेली नसल्याचा आरोप केला आहे. पाणीपुरवठा यंत्रणेची तातडीने दुरुस्ती, जलवाहिन्यांची तपासणी, जलसाठ्यांची स्वच्छता तसेच पाण्याची गुणवत्ता तपासून त्याचा अहवाल जाहीर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

स्वच्छ पिण्याचे पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. मात्र नेरळमध्ये नागरिकांना नियमित व शुद्ध पाणी मिळत नसल्याने हा केवळ गैरसोयीचा नव्हे, तर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा प्रकार आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande