
परभणी, 27 जुलै (हिं.स.)।
येथील शारदा महाविद्यालयातील हेमराजजी जैन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि ज्ञानदा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणार्या तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) व लिपीक पदांच्या स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. तलाठी व लिपीक भरतीसाठी शासनाने सुमारे पाच हजार पदांची जाहिरात प्रसिद्ध केली असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 ऑगस्ट असून परीक्षा 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शारदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन पवार यांच्या पुढाकारातून परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, अद्ययावत ग्रंथालय, सुसज्ज अभ्यासिका तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक संदर्भग्रंथांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मार्गदर्शन वर्गांना 3 ऑगस्टपासून शारदा महाविद्यालयातील हेमराजजी जैन सभागृहात प्रारंभ होणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis