यवतमाळ : शासकीय रुग्णालयाच्या ओपीडीचे होणार नूतनीकरण
यवतमाळ, २७ जुलै (हिं.स.) : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) कार्यरत असलेल्या जुन्या इमारतीचे लवकरच नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत ओपीडीची सेवा रुग्णालय परिसरातील अन्य इमारतींम
Government Outpatient Department to be relocated.


यवतमाळ, २७ जुलै (हिं.स.) : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) कार्यरत असलेल्या जुन्या इमारतीचे लवकरच नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत ओपीडीची सेवा रुग्णालय परिसरातील अन्य इमारतींमध्ये तात्पुरती स्थलांतरित करण्यात येणार असून, नूतनीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत ही व्यवस्था कायम राहणार आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती रुग्णालय प्रशासनाकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

रुग्णालय सुरू झाल्यानंतर बांधण्यात आलेल्या या इमारतीत अनेक वर्षांपासून बाह्यरुग्ण विभाग कार्यरत आहे. याच इमारतीत सध्या आपत्कालीन व अपघात विभागही सुरू आहे. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत या इमारतीतील सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अद्ययावत तपासणी कक्ष, डॉक्टरांसाठी आवश्यक सुविधा, सुसज्ज तपासणी बेड, स्वच्छतागृहे तसेच आधुनिक फर्निचरचा अभाव असल्याने रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ही परिस्थिती लक्षात घेऊन बाह्यरुग्ण विभागाचे सर्वंकष नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सुमारे २० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून त्याआधी ओपीडीचे स्थलांतर करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक जागांची निवड करण्याचे काम पूर्ण झाल्याचे समजते.

दरम्यान, रुग्णालयातील मेडिसीन विभागाच्या अतिदक्षता विभागाशेजारील जागा तसेच कँटीन परिसराचा पर्यायी व्यवस्था म्हणून वापर करण्याच्या दृष्टीने रुग्णालय प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. नूतनीकरणाचे काम सुरू होताच बाह्यरुग्ण विभाग नव्या तात्पुरत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात येणार असून, रुग्णसेवा अखंडित ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे

------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande