विदर्भ–मराठवाड्यात आंध्रातील अवैध सावकारांचे जाळे
वाढत्या व्याजदराने सर्वसामान्य आर्थिक संकटात यवतमाळ, २७ जुलै (हिं.स.) : आंध्र प्रदेशातील काही खासगी सावकारांनी विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अवैध सावकारीचे जाळे उभारल्याचा आरोप होत आहे. मजूर, छोटे व्यावसायिक, कामगार आणि रोजंदारीवर उदरनिर्
सावकारीच्या पाशात अडकलेविदर्भ-मराठवाड्यातील मजूर:हप्ता न दिल्यास रोज 200 रुपयांचा दंड अन् धमकावल्याचा आरोप


वाढत्या व्याजदराने सर्वसामान्य आर्थिक संकटात

यवतमाळ, २७ जुलै (हिं.स.) : आंध्र प्रदेशातील काही खासगी सावकारांनी विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अवैध सावकारीचे जाळे उभारल्याचा आरोप होत आहे. मजूर, छोटे व्यावसायिक, कामगार आणि रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांना जादा व्याजाच्या कर्जाच्या विळख्यात अडकवून लाखो रुपयांची व्याजवसुली केली जात असल्याची चर्चा असून, या प्रकारामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील प्रभाकर रेड्डी यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येणाऱ्या एका गटाकडून 'श्री लक्ष्मी गणपती' या नावाने कार्ड छापून फायनान्सच्या माध्यमातून कर्जवाटप केले जात असल्याचा आरोप आहे. यवतमाळसह नांदेड आणि इतर जिल्ह्यांतील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप करून व्याजाचा व्यवसाय सुरू असल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यातील पुसद, दारव्हा, दिग्रस, इस्लापूर, रोहनदेवी, मांडा, मोहा, रुई, मोती आदी भागांत अशा प्रकारची सावकारी सुरू असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. दहा हजार रुपयांच्या कर्जावर ९० दिवसांत सुमारे अडीच हजार रुपये व्याज आकारले जात असल्याचा तसेच हप्ता थकल्यास दररोज दंडही आकारला जात असल्याचा आरोप आहे.

कर्जवसुलीसाठी स्थानिक एजंट आणि गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचा वापर होत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे अनेक मजूर आणि लहान व्यावसायिक कर्जबाजारी झाले असून काहींना गाव सोडून स्थलांतर करण्याची वेळ आल्याचेही सांगितले जात आहे. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर धमक्या मिळत असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे अवैध सावकारीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, पुसदचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते यांनी अवैध सावकारी करणाऱ्यांवर संबंधित विभागामार्फत कारवाई केली जात असल्याचे सांगितले. अशा कारवाईदरम्यान पोलिस संरक्षण दिले जाते आणि चौकशीत दोषी आढळल्यास गुन्हे दाखल केले जातात. नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी पुढे आणाव्यात, असे आवाहन करत यापुढे अवैध सावकारी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande