
वर्धा, 27 जुलै (हिं.स.) एल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ९० ते ९२ टक्केच पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाच्यावतीने वर्तविण्यात आला होता. जून नंतर जुलैतही जिल्ह्यात पावसाची तुट कायम असल्याने हवामान विभागाचा हा अंदाज आता खरा ठरू पाहत आहे. यंदाच्या वर्षी सुरूवातीला पाऊस लांबणीवर गेल्याने पेरण्याही खोळंबल्या होत्या. नंतर पेरणी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना गती दिली. जिल्ह्यात सध्या ९८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून सध्या पीक परिस्थिती समाधानकारक आहे. अंकुरलेले कपाशी, सोयाबीन, तूर आदी पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस बेपत्ताच झाल्याने अंकुरलेल्या पिकांना चांगलीच तडन सोसावी लागली. तर नंतर रिमझिम पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली.
तसेच आता पुन्हा पावसाने विश्रांती घेतली असली तरी अजूनही मुसळधार पावसाअभावी जिल्ह्यातील माठे व मध्यम जलाशय निम्म्याहून अधिक रितेच आहेत. परिणामी, शेतकऱ्यांसह नागरिकांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात सेलू ६३.०८ टक्के, देवळी ७४.०६ टक्के, आर्वी ६८.०० टक्के, आष्टी ७८.०५ टक्के, कारंजा ७२.०४ टक्के, हिंगणघाट ५५.०७ टक्के, समुद्रपूर ६३.०७टक्के, टक्के पाऊस २६ जुलै पर्यंत पडला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत केवळ ७५ टक्केच पाऊस झाला. तर जुलै महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ६८.०५ टक्के पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. जिल्ह्यात येत्या काळात मुसळधार पाऊस होत जलाशय फुल्ल न झाल्यास जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना आगामी काळात पाणी टंचाईच्या समस्येला तोंड घ्यावे लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी