
वेळेत न भरल्यास नाव वगळले जाण्याची शक्यता
अमरावती, २७ जुलै (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत २५ लाख मतदारांपैकी आतापर्यंत केवळ १६ लाख मतदारांनी गणना फॉर्म भरले असून, सुमारे ९ लाख नागरिकांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. वेळेत फॉर्म न भरल्यास त्यांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने जनजागृती मोहीम अधिक वेगाने सुरू केली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या वतीने जून महिन्यापासून मतदार यादीचे विशेष पुनरिक्षण सुरू असून, या प्रक्रियेत नवीन मतदार यादी तयार केली जाणार आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सर्व पात्र मतदारांना आपल्या मतदान केंद्रावर जाऊन गणनापत्रक भरून तातडीने जमा करण्याचे आवाहन केले आहे.
मतदारांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर मतदान केले होते, त्याच केंद्रावर जाऊन संबंधित बीएलओकडून गणनापत्रक घेऊन ते पूर्ण भरावे. गणनापत्रक न भरल्यास संबंधित मतदाराचे नाव आगामी प्रारूप मतदार यादीतून वगळले जाऊ शकते.
विशेष अभियानानंतरही बीएलओ प्रत्येक घराला भेट देऊन गणना प्रपत्र भरून घेणार आहेत. या प्रपत्रात मतदाराची अद्ययावत माहिती, पूर्वीच्या नोंदींची पडताळणी, जन्मतारीख तसेच मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक (ऐच्छिक) नोंदविण्यात येईल. प्रपत्रावर मतदार किंवा कुटुंबातील प्रौढ सदस्याची स्वाक्षरी आवश्यक असून भरलेल्या प्रपत्राची प्रतही मतदाराला देण्यात येणार आहे.
गृहभेटीदरम्यान घर बंद आढळल्यास बीएलओ संपर्कासाठी सूचना ठेवतील. त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यास आणखी दोन वेळा भेट दिली जाईल. सलग तीन भेटींमध्ये मतदार अनुपस्थित, स्थलांतरित किंवा उपलब्ध न झाल्यास संबंधिताचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केले जाणार नाही.
सुधारित कार्यक्रमानुसार, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण ८ ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल. १७ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील. सुनावणीची प्रक्रिया १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी