मेळघाटातील २१ बालकांना आढळला जन्मजात हृदयरोग
अमरावती, 27 जुलै (हिं.स.) | कुपोषण, दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे कायम चर्चेत असलेल्या मेळघाटातील आदिवासी बालकांच्या आरोग्याबाबत पुन्हा एकदा चिंताजनक वास्तव समोर आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व आरबीएसके अंतर्गत र
धक्कादायक ! मेळघाटातील २१ बालकांना आढळला जन्मजात हृदयरोग


अमरावती, 27 जुलै (हिं.स.) | कुपोषण, दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे कायम चर्चेत असलेल्या मेळघाटातील आदिवासी बालकांच्या आरोग्याबाबत पुन्हा एकदा चिंताजनक वास्तव समोर आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व आरबीएसके अंतर्गत राबविण्यात आलेल्या 'प्रोजेक्ट देवा' या विशेष उपक्रमात २३ जुलै रोजी तपासणी करण्यात आलेल्या बालकांपैकी तब्बल २१ बालकांना जन्मजात हृदयरोग असल्याचे निदान करण्यात आले आहे. त्यामुळे या बालकांवर तातडीने हृदयविकार शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे.

मेळघाटातील अनेक गावे दुर्गम डोंगररांगांत वसली आहेत. वाहतुकीच्या मर्यादित सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आणि परिस्थितीमुळे अनेक बालकांना वेळेत निदान व उपचार मिळत नाहीत. जन्मजात हृदयविकाराचे निदान उशिरा झाल्यास त्याचा थेट परिणाम बालकांची वाढ, पोषण आणि आयुर्मानावर होतो. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पानसे यांच्या मार्गदर्शनात तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमअंतर्गत मेळघाटात तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तब्बल १७ हजार बालकांची तपासणी करण्यात आली. यातील प्राथमिक तपासणीमध्ये १२३ बालकांना हृदयरोग असण्याची शक्यता असून, या बालकांचा पुढील टू-डी इको करण्याचा निर्णय घेतला. यातील २१ बालकांना हृदयरोग असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे निदान करण्यात आले.

कुपोषणाबरोबरच मोठी समस्या

मेळघाटात आता जन्मजात हृदयरोग हीदेखील मोठी समस्या असल्याचे तपासणी मोहिमेतून अधोरेखित झाले आहे. त्यामुळे कुपोषणाविरोधातील लढाईबरोबरच आता जन्मजात हृदयरोगाचे वेळेत निदान आणि उपचार तितकेच महत्त्वाचे आहे. दुर्गम भागातील प्रत्येक बालकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी अशाउपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

मेळघाटात हृदयरोगासाठी विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत १७हजार बालकांचे स्क्रिनिंग झाले. यात टू-डी इको केल्यानंतर २१ बालकांना जन्मजात हृदयरोग असल्याचे निदान झाले असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. असे मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. श्याम गावंडे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande