
परभणी, 27 जुलै (हिं.स.)।
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या संकल्पनेतून परभणी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी व एकाच वेळी वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून मौजे लोहगाव (ता. परभणी) येथे सोमवारी (दि. 27) वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. लोहगाव ग्रामपंचायतीला या मोहिमेत 1100 वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ पंचायत समिती परभणीचे गटविकास अधिकारी पी. एम. जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर, शाळेचा परिसर तसेच ग्रामपंचायतीच्या बाजार मैदानात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन, हरित परिसराची निर्मिती आणि भविष्यातील पिढ्यांसाठी समृद्ध पर्यावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी प्रशासक तथा विस्तार अधिकारी आर. जी. सूर्यवंशी, ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानोबा दुधाटे, अमृत देशमुख, मुख्याध्यापक, सय्यद रिझवान, विशेष शिक्षक नामदेव खुळे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सुप्रिया धाडकर, आरोग्य सेविका ज्योती नळदकर, पोलिस पाटील संजय कनसटवाड, संदीप हारगावकर, ग्रामरोजगार सेवक दीपक देशमुख, ग्रामपंचायत कर्मचारी विजय देशमुख, रमेश राऊत आणि अशोक तिडके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी वृक्षलागवड ही केवळ औपचारिकता न ठेवता प्रत्येक रोपाचे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis