दिग्रस पोलिस वसाहत जीर्णावस्थेत; जीव मुठीत धरून पोलिस कुटुंबीयांचा निवास
यवतमाळ, २७ जुलै (हिं.स.) : शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणारे पोलिस कर्मचारी स्वतःच असुरक्षित निवासस्थानी राहण्यास मजबूर असल्याचे चित्र दिग्रस येथील पोलिस वसाहतीत पाहायला मिळत आहे. येथील पोलिस क्वार्टर्सची अवस्था अत्यंत
जनतेच्या रक्षकांनाच असुरक्षित निवारा:दिग्रस पोलिस क्वार्टर्सचा प्रश्न ऐरणीवर, सत्ताधारी लोकप्रतिनिधी असतानाही पोलिसांचा गृहप्रश्न रखडला


यवतमाळ, २७ जुलै (हिं.स.) : शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणारे पोलिस कर्मचारी स्वतःच असुरक्षित निवासस्थानी राहण्यास मजबूर असल्याचे चित्र दिग्रस येथील पोलिस वसाहतीत पाहायला मिळत आहे. येथील पोलिस क्वार्टर्सची अवस्था अत्यंत जीर्ण, मोडकळीस आलेली आणि धोकादायक झाली असून, पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दिग्रस पोलिस वसाहतीतील बहुतांश इमारतींच्या भिंतींना मोठे तडे गेले असून, छतावरील कौले खिळखिळी झाली आहेत. पावसाळ्यात घरांमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी पावसापासून बचावासाठी घरांवर प्लास्टिकचे आच्छादन केले आहे. या धोकादायक परिस्थितीत लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक राहत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पोलिसांच्या निवासाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. या मतदारसंघाचे आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि खासदार हे सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी असतानाही पोलिस वसाहतीचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, जनतेच्या रक्षकांनाच सुरक्षित घर मिळत नसेल, तर विकासाच्या घोषणा नेमक्या कुणासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

स्वतःच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची चिंता मनात ठेवूनही पोलिस कर्मचारी दररोज निष्ठेने नागरिकांच्या सेवेसाठी कर्तव्य बजावत आहेत. मात्र, त्यांच्या निवासाच्या मूलभूत समस्येकडे शासन आणि पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नवीन व सुरक्षित निवासव्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पोलिस कर्मचारी, त्यांच्या कुटुंबीयांसह दिग्रसकर नागरिकांकडून होत आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande