साने गुरुजींच्या पालगडमध्ये साकारणार पुस्तकांचे गाव - उदय सामंत
रत्नागिरी, 27 जुलै (हिं.स.) । पालगड (ता. दापोली) या साने गुरुजींच्या गावी पुस्तकांचे गाव हा उपक्रम सुरू केला जाणार असून, रत्नागिरीत एक एकर क्षेत्रावर २५ कोटी रुपये खर्चून मराठी भाषा संग्रहालय उभे केले जाणार असल्याची घोषणा मराठी भाषामंत्री उदय सामं
मराठी भाषा विभाग आढावा बैठक


रत्नागिरी, 27 जुलै (हिं.स.) । पालगड (ता. दापोली) या साने गुरुजींच्या गावी पुस्तकांचे गाव हा उपक्रम सुरू केला जाणार असून, रत्नागिरीत एक एकर क्षेत्रावर २५ कोटी रुपये खर्चून मराठी भाषा संग्रहालय उभे केले जाणार असल्याची घोषणा मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी केली. रत्नागिरीत मराठी भाषा विभाग आढावा बैठक आणि साहित्यिकांसोबत संवाद बैठक झाली. त्यावेळी हे निर्णय घेतल्याचे सामंत यांनी सांगितले. पुण्यानंतरचा दुसरा मोठा पुस्तक महोत्सव रत्नागिरीत सुरू केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र साहित्य संस्कृती संघाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी, मराठी भाषा समिती सदस्य प्रकाश देशपांडे, गजानन पाटील, विश्वकोश निर्मिती मंडळ तथा राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे उपस्थित होते. रत्नागिरीत एक एकरवर उभारल्या जाणार असलेल्या भाषा संग्रहालयात बोलीभाषेवर संशोधन केंद्र, पुस्तक विक्री केंद्र आणि शब्दकोश निर्मितीचे दालन असेल, असे श्री. सामंत म्हणाले. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विभाग हे स्वतंत्र कार्यालय स्थापन करून, तिथे मराठी भाषा अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. १०० कोटी रुपये खर्चून नरिमन पॉइंटला मराठी भाषा भवन, तर ऐरोलीत ४० कोटी रुपये खर्चून संशोधन केंद्र बांधण्यात येणार आहे, अशी माहितीही सामंत यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande