वर्धा-तुरीच्या आंतरपिकात हळदीचा नवा प्रयोग, कमी खर्चात दुहेरी उत्पन्नाचा प्रयत्न
वर्धा, 01 ऑगस्ट (हिं.स.)बदलत्या हवामानाचा सामना करत पारंपरिक शेतीला आधुनिक प्रयोगांची जोड देणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. अशाच एका प्रयोगातून पवनार येथील एका प्रगतशील शेतकऱ्याने तुरीच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून हळदीची लागवड करून शेतीत नवा आद
वर्धा-तुरीच्या आंतरपिकात हळदीचा नवा प्रयोग, कमी खर्चात दुहेरी उत्पन्नाचा प्रयत्न


वर्धा, 01 ऑगस्ट (हिं.स.)बदलत्या हवामानाचा सामना करत पारंपरिक शेतीला आधुनिक प्रयोगांची जोड देणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. अशाच एका प्रयोगातून पवनार येथील एका प्रगतशील शेतकऱ्याने तुरीच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून हळदीची लागवड करून शेतीत नवा आदर्श निर्माण केला आहे. सध्या बाजारात हळदीला चांगली मागणी आणि समाधानकारक दर मिळत असल्याने हा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

वर्धा जिल्ह्यातील वायगाव परिसर हा दर्जेदार हळद उत्पादनासाठी ओळखला जातो. येथील हळदीला बाजारपेठेत विशेष मागणी असून चांगला भावही मिळतो. याच पार्श्वभूमीवर पवनार येथील शेतकऱ्याने वायगावच्या धर्तीवर हळदीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. मात्र, स्वतंत्र क्षेत्रात लागवड करण्याऐवजी तुरीच्या पिकात आंतरपीक म्हणून हळद लावून उत्पादन खर्च कमी करण्याचा आणि एकाच शेतातून दुहेरी उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या तुरीच्या ओळींमध्ये हळदीची रोपे चांगली वाढताना दिसत आहेत. पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने हळदीच्या वाढीस पोषक वातावरण तयार झाले आहे. तूर आणि हळद या दोन्ही पिकांचे वाढीचे कालावधी वेगवेगळे असल्याने जमिनीचा प्रभावी वापर होण्यास मदत होत असल्याचे शेतकरी सांगतात. कृषी तज्ज्ञांच्या मते, आंतरपीक पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते. तसेच कीड-रोगांचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होण्यास आणि उत्पादनाचा धोका कमी करण्यासही ही पद्धत उपयुक्त ठरते. एका पिकाचे नुकसान झाल्यास दुसऱ्या पिकातून आर्थिक आधार मिळू शकतो. त्यामुळे हवामानातील अनिश्चिततेच्या काळात आंतरपीक पद्धतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

आंतरपिकाचा प्रयोग ठरतोय फायदेशीर

सतत बदलणारे हवामान आणि शेतीतील वाढता खर्च लक्षात घेता अनेक शेतकरी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करत आहेत. पवनार येथील शेतकऱ्याने तुरीच्या पिकामध्ये हळदीची लागवड करून त्याच दिशेने पाऊल टाकले आहे. सध्या बाजारात हळदीला चांगली मागणी व समाधानकारक दर मिळत असल्याने या प्रयोगाकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. एकाच शेतातून दोन पिकांचे उत्पादन मिळण्याबरोबरच आर्थिक जोखीमही कमी होते. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास वर्धा जिल्ह्यातील इतर शेतकरीही हळदीकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

----------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande