
लातूर, ३ ऑगस्ट (हिं.स.) : अहमदपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.
अहमदपूर नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘नमो उद्यान’ तसेच शहराच्या वाढीव वस्तीसाठी राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा पाईपलाईन योजनेच्या शुभारंभ व उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बाबासाहेब पाटील म्हणाले की, लोकप्रतिनिधी म्हणून अहमदपूरच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून शहरातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. पाणीपुरवठा, रस्ते, उद्याने आणि सार्वजनिक सुविधा यांना प्राधान्य देत विकासकामे हाती घेतली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
नगरपालिकेने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यामुळे वीज खर्चात बचत होऊन नगरपालिकेची आर्थिक स्थिती अधिक सक्षम होईल. तसेच भविष्यातील लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन दीर्घकालीन पाणी नियोजन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरात सुसज्ज नाट्यगृह उभारण्यासाठी योग्य जागेची निवड करून प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करत, प्रस्ताव प्राप्त होताच आवश्यक निधी मंजूर केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
अहमदपूरसाठी प्रस्तावित रिंग रोड लवकरच मार्गी लागणार असून त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल, अपघातांचे प्रमाण घटेल आणि शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अहमदपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रतिक लंबे यांनी प्रास्ताविक करताना ‘नमो उद्यान’ प्रकल्पाची वैशिष्ट्ये तसेच वाढीव वस्तीसाठी राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा पाईपलाईन योजनेची माहिती दिली. ही योजना नागरिकांना दर्जेदार पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष स्वप्निल व्हते, उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, मुख्याधिकारी प्रतिक लंबे, पंचायत समिती सभापती सुरज पाटील, उपनगराध्यक्ष मुजिब पटेल, जिल्हा परिषद सदस्य अश्विन नागराळे व प्रफुल्ल गुंडरे, पंचायत समिती उपसभापती आयोध्या केंद्रे, उपनगराध्यक्ष अय्याज शेख, पाणीपुरवठा सभापती शुभांगी रेड्डी, बांधकाम सभापती जहूरबेग हबीब, स्वच्छता सभापती हुसेन मणियार, क्रीडा व शिक्षण सभापती प्रतिक रेड्डी, महिला व बालकल्याण सभापती अर्चना मजगे, उपसभापती भाग्यश्री बारमाळे, नगरसेविका रजिया शेख यांच्यासह नगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विविध विभागांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम तत्तापुरे आणि दयानंद चोपणे यांनी केले, तर विकास सोमवंशी यांनी आभार मानले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis