
-पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
परभणी, 03 ऑगस्ट (हिं.स.)।राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी व शेतीत नाविन्यपूर्ण तंत्रांचा अवलंब करता यावा, यासाठी राबविण्यात येणाऱ्या देशाबाहेरील अभ्यास दौरे – राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यास ५ शेतकऱ्यांचा लक्षांक प्राप्त झाला आहे. या योजनेसाठी इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी १३ ऑगस्टपर्यंत विहित नमुन्यात अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्राप्त प्रस्तावांमधून सोडत पद्धतीने व ज्येष्ठता यादीनुसार लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. निवड प्रक्रियेत किमान एक महिला शेतकरी तसेच किमान एक केंद्र अथवा राज्य कृषी पुरस्कारप्राप्त किंवा पीक स्पर्धा विजेता शेतकरी यांचा समावेश करण्यात येणार आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी युरोप तसेच चीन या देशांची निवड करण्यात आली आहे. युरोपमध्ये फलोत्पादन, सेंद्रिय शेती व दुग्धोत्पादन क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करता येणार असून, चीनमध्ये विविध कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढीसाठीची आधुनिक साधने व कृषी प्रदर्शनांचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार स्वतः शेतकरी असणे, त्याच्या नावावर अद्ययावत ७/१२ व ८-अ उतारा, अँग्रीस्टॅक फार्मर आयडी, वैध पासपोर्ट, आधार कार्ड, शिधापत्रिका तसेच शारीरिक तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय दौऱ्याच्या दिवशी किमान २५ वर्षे पूर्ण असावे. तसेच अर्जदार शासकीय, निमशासकीय, सहकारी किंवा खासगी सेवेत नसावा तसेच यापूर्वी शासनाच्या अर्थसहाय्याने विदेश अभ्यास दौरा केलेला नसावा. इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावेत. शेतकरी निवडीचे अंतिम अधिकार राज्यस्तरीय समितीकडे राखीव असून, पात्र शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis