
रत्नागिरी, 1 ऑगस्ट (हिं.स.) । मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजणारी (ता. लांजा) पुलावर आज (दि. १ ऑगस्ट) सायंकाळी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावर उलटला. काही क्षणातच ट्रकने अचानक पेट घेतल्याने आगीचे मोठे लोट उसळले आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या अपघातात ट्रकमधील दोघेजण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले.या अपघातामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी