
अमरावती, 01 ऑगस्ट (हिं.स)
भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ३७ बडनेरा विधानसभा मतदारसंघांतर्गत विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ राबविला जात आहे. या मोहिमेत आजअखेर ४७,८९० असंग्रहित मतदार आढळले आहेत. त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात येणार आहेत. त्यामुळे पात्र मतदारांनी बीएलओकडे जाऊन तातडीने पडताळणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.या मोहिमेत घरोगरी सर्वेक्षण कालावधी हा ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ असून यात गणना प्रपत्र वाटप करणे आणि गोळा करून डिजिटाईस करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यानंतर प्रारूप मतदारयादी १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यात बडनेरा विधानसभा मतदारसंघातील ३४५ ग्रामीण व शहरी भाग समाविष्ट आहे.
'असंग्रहित' मतदारांमध्ये मयत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले नागरिक, अनुपस्थित मतदार आणि दुबार नोंदणी असलेले मतदार यांचा समावेश आहे. एसआयआरमधील असंग्रहित मतदारांची माहिती देण्यासाठी आज ३१ जुलै रोजी शाम चौक येथील निवडणूक कार्यालयात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत असंग्रहित मतदारांच्या आकडेवारीबाबत माहिती देऊन त्यांना मतदारयादीतून वगळण्याच्या प्रक्रियेबाबत सूचना देण्यात आली.मतदारयादीतील नावाबाबत आपल्या परिसरातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून असंग्रहित दर्शविलेल्या नावाची पडताळणी करून घ्यावी. जर पात्र मतदार चुकीने 'असंग्रहित' म्हणून दर्शविला गेला असेल, तर त्याचे नाव तात्काळ निवडणूक विभागात किंवा संबंधित बीएलओकडे कळवावे. जेणेकरून कोणताही पात्र मतदार वगळल्या जाणार नाही. तसेच विहित मुदतीत योग्य गणना प्रपत्र जमा न केल्यास संबंधित नाव मतदार यादीतून वगळले जाणार असल्याचे मतदार नोंदणी अधिकारी तथा महसूल उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी