
बीड, 01 ऑगस्ट (हिं.स.)।
रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या भगवान रावण जंगले (रा. रामनगर, परळी वैजनाथ) यांना वनविभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या ₹५० हजारांच्या आर्थिक मदतीचा धनादेश आज आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
भगवान जंगले हे चांदापूर रस्त्यालगतच्या शेतात सालगडी म्हणून काम करतात. दिनांक २६ मे २०२६ रोजी सकाळी शेतात काम करण्यासाठी जात असताना अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. घटनेची नोंद वनविभागाकडे झाल्यानंतर संबंधित पंचनामा व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
या प्रकरणाची दखल घेत विभागीय वनाधिकारी अमोल गरकळ यांनी मागील महिन्यात वनविभागाच्या नियमानुसार भगवान जंगले यांना ₹५० हजारांची आर्थिक मदत मंजूर केली. त्यानुसार आज हा धनादेश आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आला.
यावेळी परळी वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान गित्ते यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis