
रायगड, 01 ऑगस्ट (हिं.स.)। पनवेल महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शासकीय स्तरावर उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमाला महापौर नितीन पाटील, सभागृह नेते अॅड. प्रकाश बिनेदार, अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, नगरसेवक, अधिकारी, कलाकार आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाची संकल्पना सभागृह नेते अॅड. प्रकाश बिनेदार यांनी मांडली होती. महापौर नितीन पाटील यांनी त्यास तत्काळ मान्यता दिल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या ऐतिहासिक उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली.
कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावरील कलाकारांनी पोवाडे, शाहिरी, गीत आणि नाट्यरूप सादरीकरणातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा प्रभावी आढावा सादर केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, कामगार चळवळ, साहित्य क्षेत्रातील योगदान आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी दिलेल्या लढ्याचे प्रभावी चित्रण करण्यात आले. शाहिरी गीतांच्या तालावर उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाला रंगत आणली.
महापौर नितीन पाटील यांनी आपल्या भाषणात, जयंती म्हणजे केवळ जन्मदिन साजरा करणे नव्हे, तर महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून समाजात त्यांचा जागर करण्याचा दिवस आहे, असे सांगितले. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करत ही जयंती दरवर्षी अधिक व्यापक स्वरूपात साजरी करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
सभागृह नेते अॅड. प्रकाश बिनेदार यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले. यंदा कार्यक्रमाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचू शकली नसल्याची खंत व्यक्त करत, पुढील वर्षापासून अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक स्वरूपात आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या शेवटी महानगरपालिकेच्या वतीने मान्यवर, कलाकार आणि समाजातील ज्येष्ठ व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. या ऐतिहासिक उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करत, पनवेलच्या सांस्कृतिक इतिहासातील हा महत्त्वाचा टप्पा असल्याची भावना व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)