
जळगाव, 01 ऑगस्ट (हिं.स.) लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि लोककलेच्या माध्यमातून कष्टकरी, वंचित, उपेक्षित आणि सर्वसामान्यांच्या वेदनांना वाचा फोडली. त्यांनी सामाजिक समता, स्वाभिमान आणि माणुसकीचा विचार समाजमनात रुजविला. त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आणि प्रत्येक पिढीला संघर्षातून उभे राहण्याची प्रेरणा देणारे आहेत, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात विविध कार्यक्रमांनी उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे, महापौर दीपमाला काळे, महिला आघाडीच्या उपनेत्या सरिताताई कोल्हे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर समाजमन जागवणारे लोकशाहीर होते. त्यांच्या लेखणीत मातीचा सुगंध, श्रमिकांच्या घामाचा सन्मान आणि माणुसकीचा ध्यास होता. त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली आणि कष्ट करणाऱ्या माणसाला स्वाभिमानाने जगण्याची ताकद दिली. 'पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही, तर कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे' हा त्यांचा विचार आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे जतन करणे, सामाजिक समतेची भावना दृढ करणे आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी कार्य करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
कार्यक्रमासाठी जळगाव शहर अण्णाभाऊ साठे उत्सव समिती, राष्ट्रीय साठे सेना, महाशक्ती फाउंडेशन तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, सायंकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित पारंपरिक पोवाड्याच्या कार्यक्रमाने जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर