
गडचिरोली, 01 ऑगस्ट (हिं.स.)
अहेरी नगर पंचायतीचे कर निर्धारक अधिकारी वैभव पांढरे मारहाण प्रकरणात अखेर एक मोठी घडामोड समोर आली आहे. गेल्या ५२ दिवसांपासून कारागृहात असलेले डॉ. अजय कंकडालवार यांच्यासह इतर तीन आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे कंकडालवार समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून अहेरी शहरात कार्यकर्त्यांनी धुमधडाक्यात जल्लोष साजरा केला.
कोर्टाचा निर्णय आणि ५० हजारांचा मुचलका
अतिरिक्त सत्र न्यायाधीश-०२ (अहेरी) मा. रोहन रेहपाडे यांच्या न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. डॉ. अजय कंकडालवार, अजय नैताम, श्रीनिवास लक्ष्मण आणि इम्रान पठाण या चौघांनाही प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
असा रंगला न्यायालयात युक्तिवाद
या प्रकरणात आरोपींच्या बाजूने नागपूरचे वरिष्ठ अधिवक्ता (माजी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश) अनिरुद्ध चांदेकर आणि अहेरीचे वरिष्ठ अधिवक्ता सतीश जैनवार यांनी न्यायालयात अतिशय भक्कम आणि प्रभावी बाजू मांडली, तर सरकारच्या वतीने सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला. अखेर आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने जामीन मंजूर केला.
काय आहे नेमके प्रकरण?
अहेरी नगर पंचायतीचे कर निर्धारक अधिकारी वैभव पांढरे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी १० जून रोजी डॉ. अजय कंकडालवार, अजय नैताम, श्रीनिवास लक्ष्मण आणि इम्रान पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तब्बल ५२ दिवस हे सर्व आरोपी तुरुंगात होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond