
अकोला, 01 ऑगस्ट (हिं.स.) :राज्यात नवे सहकार धोरण सहकार क्षेत्रातील अभ्यासक आणि जाणकारांच्या सूचनांच्या आधारे सर्वसमावेशक करण्यावर भर देण्यात येत आहे. सेवा सहकारी सोसायट्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, सोसायट्यांनी गावाच्या विकासाचे केंद्र बनावे, असे प्रतिपादन राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुढाकाराने सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी करण्यात आलेल्या कार्याबद्दल तसेच गटसचिवांना नियमित सेवेत सामावून घेण्याच्या निर्णयानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक डॉ. संतोषकुमार कोरपे होते. यावेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार अमित झनक, माजी मंत्री सुभाष ठाकरे, बँकेचे चेअरमन डॉ. जयराज कोरपे, व्हाइस चेअरमन रामेश्वर ठाकरे, विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन, सुदाम शेडगे, जिल्हा उपनिबंधक गितेशचंद्र साबळे, अंगद महाराज सूर्यवंशी, वाशिम जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, शोभाताई झनक आदी मान्यवर उपस्थित होते.
सहकारमंत्री पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील सहकार चळवळ देशासाठी आदर्श ठरली आहे. अनेक ज्येष्ठ सहकार नेत्यांनी आयुष्यभर कष्ट करून ही चळवळ उभी केली असून, हा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता तरुण पिढीने स्वीकारली पाहिजे.
सेवा सहकारी संस्थांनी गावात शेतकरी हितासाठी कार्य करून विकासाचे केंद्र बनावे. शेतकऱ्यांनी बाजारातील मागणी, उपलब्धता आणि भविष्यातील गरजांचा अभ्यास करून पीक निवडल्यास शेतमालाला योग्य भाव मिळू शकतो. आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरामुळे शेती अधिक फायदेशीर करण्याचा मार्ग खुला होणार आहे. त्यामुळे अचूक पीक नियोजनासह शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात बँकेचे अध्यक्ष डॉ. जयराज कोरपे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजाचा आढावा घेत सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी गटसचिवांना नियमित सेवेत सामावून घेण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. आता सचिवांसोबतच सेवा सोसायट्यांची जबाबदारीही वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक सेवा सोसायटीने सचिवांच्या वेतनाइतका नफा कमावण्याचे उद्दिष्ट ठेवावे. त्यासाठी व्यवस्थापन, प्रशिक्षण आणि आर्थिक शिस्त आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तालुका पातळीवर देखरेख संघ स्थापन करणे, जिल्हा सहकार बोर्डाला बळकटी देणे आणि प्रशिक्षण यंत्रणा मजबूत करण्याची मागणीही डॉ. कोरपे यांनी यावेळी केली. आमदार अमित झनक आणि माजी मंत्री सुभाषराव ठाकरे यांनीही मनोगत व्यक्त केले.---------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे