
अकोला, १ ऑगस्ट (हिं.स.) : राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी अधिक कडक करण्यात येत आहे. नागपूर आणि अमरावतीनंतर आता अकोला जिल्ह्यातही १ ऑगस्टपासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे.
हेल्मेट न वापरता दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख चौक, सिग्नल आणि गर्दीच्या मार्गांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट करत प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
रस्त्यांच्या खड्ड्यांवरून संघटनांचा विरोध
द
रम्यान, हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला काही सामाजिक संघटनांनी विरोध दर्शविला आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असून रस्त्यांची अवस्था खराब असल्याचे सांगत, आधी रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि त्यानंतरच हेल्मेट सक्तीची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
खराब रस्ते, वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी आणि अपघातांची कारणे यावरही प्रशासनाने लक्ष द्यावे, असे संघटनांचे म्हणणे आहे.
हेल्मेट खरेदीसाठी गर्दी
हेल्मेट सक्ती लागू झाल्यानंतर शहरातील हेल्मेट विक्रेत्यांकडे नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. नियमांचे पालन करण्यासाठी अनेक दुचाकीस्वार नवीन हेल्मेट खरेदी करत आहेत.
मात्र बाजारात काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे हेल्मेट विकले जात असल्याची शक्यता स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केली असून, अशा हेल्मेटमुळे अपघाताच्या वेळी जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
अकोल्यात हेल्मेट सक्तीला नागरिकांचा कितपत प्रतिसाद मिळतो आणि रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागले आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय साधणे महत्त्वाचे ठरणार आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे