अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी नवीन कायदा प्रभावी ठरेल : सहकार मंत्री
पीएम-किसानचा पुढील हप्ता लवकरच जमा होणार अकोला, १ ऑगस्ट (हिं.स.) : अवैध सावकारीविरोधात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली असून, यासंदर्भातील नवीन विधेयक अधिवेशनात मांडण्यात आले आहे. या कायद्यामुळे दोषींवरील शिक्षेत वाढ करण्यात आली असून अवैध सावकारीला
Photo


पीएम-किसानचा पुढील हप्ता लवकरच जमा होणार

अकोला, १ ऑगस्ट (हिं.स.) : अवैध सावकारीविरोधात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली असून, यासंदर्भातील नवीन विधेयक अधिवेशनात मांडण्यात आले आहे. या कायद्यामुळे दोषींवरील शिक्षेत वाढ करण्यात आली असून अवैध सावकारीला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

अकोला दौऱ्यावर असताना सहकार मंत्री पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, अवैध सावकारीच्या जुन्या प्रकरणांचीही तपासणी सुरू आहे. ज्या प्रकरणांमध्ये गैरप्रकार आढळतील, तेथे संबंधित अधिकाऱ्यांमार्फत कठोर कारवाई करण्यात येत आहे.सरकारची भूमिका नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताची असून नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पीएम-किसान योजनेबाबत अफवांवर स्पष्टीकरण

कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम-किसान योजनेचा लाभ मिळणार नाही, या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. पीएम-किसान योजनेचा पुढील हप्ता दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.आधार प्रमाणीकरण पूर्ण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी दहा दिवसांनंतर पुन्हा लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सवलतींवर चर्चा

पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध सवलतींबाबत सरकारमध्ये चर्चा सुरू असल्याचे सहकार मंत्र्यांनी नमूद केले.याशिवाय शालेय शिक्षणामध्ये सहकार विषयाचा समावेश करण्यात यावा, याबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

--------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande