
अकोला, 01 ऑगस्ट (हिं.स.)।
शहरात होत असलेल्या विकासात्मक कामांमुळे मुख्य रस्ते, सर्व्हिस गल्ली आणि मोहोल्यात सर्वत्र सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनले आहेत. परिणामी, जमिनीमध्ये पावसाचे पाणी मुरण्याचे प्रमाण नगण्य झाले असून भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. भविष्यात उद्भवणारी संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता, भूजल पातळी वाढविणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे ही काळाची गरज बनली आहे. या गंभीर प्रश्नावर मात करण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात, संस्था, व्यावसायिक आस्थापना तसेच शासकीय व निमशासकीय इमारतींमध्ये 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' (पावसाच्या पाण्याचे संकलन व जलपुनर्भरण) प्रणाली उभारावी, असे आवाहन अकोला महानगरपालिकेच्या महापौर सौ. शारदा रणजित खेडकर यांनी केले आहे.
महापौर सौ.खेडकर यांनी सांगितले की, पावसाचे पाणी थेट नाल्यांमध्ये वाहून जाण्याऐवजी ते जमिनीत मुरविल्यास भूजल पातळी वाढण्यास मदत होते. यामुळे विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांना पुनर्भरण मिळून भविष्यातील पाण्याची उपलब्धता सुधारण्यास हातभार लागतो. हवामानातील बदल आणि वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचे नियोजन ही काळाची गरज बनली असून रेन वॉटर हार्वेस्टिंग हा त्यासाठी प्रभावी आणि पर्यावरणपूरक उपाय आहे.
तरी शहरातील सर्व शासकीय, प्रशासकीय इमारती, संकुले, शैक्षणिक संस्था, उद्योग, व्यापारी प्रतिष्ठाने तसेच मोठ्या इमारतींनी जलपुनर्भरणाची व्यवस्था करावी. तसेच नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणालीचा समावेश करण्यास प्राधान्य द्यावे.
अकोला महानगरपालिका जलसंवर्धन आणि जलपुनर्भरणाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविणार असून नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन ही यावेळी अकोला शहराच्या प्रथम नागरीक तथा महापौरांनी केले. प्रत्येक थेंब वाचवा, भविष्यासाठी पाणी साठवा हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे