
अकोला, 01 ऑगस्ट (हिं.स.) :राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत महत्त्वाच्या आरोग्य निर्देशांकांच्या आधारे करण्यात आलेल्या संस्थांच्या राज्यस्तरीय क्रमवारीत अकोला जिल्हा महिला रुग्णालयाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एप्रिल महिन्याच्या रँकिंगमध्ये ८३ गुण मिळवत जिल्हा महिला रुग्णालयाने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
या यशामुळे अकोला जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत मानाचा तुरा रोवला गेला असून, ही कामगिरी उपसंचालक डॉ. सुशीलकुमार वाकचौरे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती पुलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूराव पवार तसेच रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध प्रयत्नांचे फलित असल्याचे मानले जात आहे.
राज्यस्तरीय मूल्यांकनामध्ये रुग्णालयाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा, रुग्णांशी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सुसंवाद, स्वच्छता व्यवस्था, पारदर्शक प्रशासन, सेवा गुणवत्ता तसेच रुग्णाभिमुख उपक्रम अशा विविध निकषांचा समावेश करण्यात आला होता.
या सर्व निकषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हा महिला रुग्णालयाने राज्यात तिसरा क्रमांक मिळविण्याचा बहुमान प्राप्त केला. या यशामुळे रुग्णांना दर्जेदार, विश्वासार्ह आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध होत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपसंचालक आरोग्य सेवा यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूराव पवार तसेच रुग्णालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे