
पुणे, 01 ऑगस्ट (हिं.स.)। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यापूर्वी लावण्यात आलेल्या 'शौर्यभूमीत भारताच्या चाणक्याचे स्वागत' या मजकुराच्या स्वागत बॅनरवरून वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने लावण्यात आलेला हा बॅनर शनिवारी सकाळी हटविण्यात आला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या स्वागताच्या बॅनरवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. 'शौर्यभूमीत भारताच्या चाणक्याचे स्वागत' असा मजकूर असलेला हा बॅनर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने खंडोजी बाबा चौकात लावण्यात आला होता. मात्र, अमित शहा यांची 'भारताचे चाणक्य' अशी केलेली तुलना विरोधकांनी आक्षेपार्ह असल्याचे सांगत टीका केल्यानंतर संबंधित बॅनर शनिवारी सकाळी हटविण्यात आला.या बॅनरची सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर वाढता वाद लक्षात घेऊन बॅनर काढून टाकण्यात आल्याची माहिती समोर आली.
दरम्यान, अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान काँग्रेसने काळे झेंडे दाखवत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
पोलीस उपायुक्त गौहर हसन यांनी सांगितले की, काँग्रेसला सुमारे २५० आंदोलकांसह आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे. आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही कार्यकर्त्यांना आधीच ताब्यात घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु