
पुणे, 01 ऑगस्ट (हिं.स.) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सातारा रस्त्यावरील उत्सव चौकात निदर्शने करत निषेध आंदोलन केले. दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला.
अमित शाह हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यासाठी पुणे दौऱ्यावर आले आहेत. गुलटेकडी येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या मैदानावर हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
काँग्रेसला पोलिसांनी सातारा रस्त्यावरील उत्सव चौकात आंदोलनासाठी परवानगी दिली होती. त्यानुसार काँग्रेसचे पूर्व विभागाध्यक्ष प्रशांत जगताप आणि पश्चिम विभागाध्यक्षा दीप्ती चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही निदर्शनांत सहभाग नोंदवला.आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवत आंदोलन शांततेत पार पाडले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु