सामाजिक गरजा ओळखून रोटरीचे कार्य सुरू : प्रांतपाल जयेश पटेल
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात लातूर, १ ऑगस्ट (हिं.स.) : समाजाच्या विविध गरजा ओळखून त्यांची पूर्तता करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य जागतिक पातळीवर रोटरी क्लबकडून केले जात आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब 3132 चे प्र
सन्मान


रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात

लातूर, १ ऑगस्ट (हिं.स.) : समाजाच्या विविध गरजा ओळखून त्यांची पूर्तता करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य जागतिक पातळीवर रोटरी क्लबकडून केले जात आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब 3132 चे प्रांतपाल जयेश पटेल यांनी केले.रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा मोरया मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी प्रांतपाल जयेश पटेल बोलत होते.

या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि उदगीरचे सुपुत्र अमोल पाटील कौळखेडकर यांचा रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने ‘उदगीर भूषण’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी रोटरी क्लबच्या २०२६-२७ या वर्षासाठी अध्यक्षपदी ॲड. विक्रम संकाये, उपाध्यक्षपदी विजयकुमार पारसेवार आणि सचिवपदी डॉ. सुधीर जाधव यांनी पदभार स्वीकारला. तसेच संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांनीही जबाबदारी स्वीकारली.

कार्यक्रमाला रो. पारुल पटेल, सहायक प्रांतपाल नागनाथ आगावणे, नगराध्यक्षा स्वाती हुडे, रोट्रॅक्ट क्लबचे प्रांत प्रमुख अमित भोसले, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे मावळते अध्यक्ष प्रशांत मांगुळकर, उपाध्यक्ष मोतीलाल डोईजोडे, सचिव विक्रम हलकीकर, प्रोजेक्ट चेअरमन संतोष फुलारी आणि गजानन चिद्रेवार यांची उपस्थिती होती.

जयेश पटेल म्हणाले की, समाजात बेरोजगारी, आरोग्य समस्या, गरिबी आणि अज्ञान यांसारख्या अनेक समस्या आहेत. या समस्यांच्या निराकरणासाठी रोटरी क्लबने सातत्याने योगदान दिले आहे. आगामी काळात रोटरीने निश्चित केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी नूतन पदाधिकाऱ्यांनी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सत्काराला उत्तर देताना अमोल पाटील कौळखेडकर यांनी रोटरी क्लबने दिलेला ‘उदगीर भूषण’ पुरस्कार पुढील कार्यासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. आपल्याला ज्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळते, त्या संधीचा उपयोग आपल्या भागाच्या विकासासाठी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी मावळते सचिव विक्रम हलकीकर यांनी मागील वर्षातील कामाचा आढावा सादर केला. मावळते अध्यक्ष प्रशांत मांगुळकर यांनी मनोगत व्यक्त केले. नूतन अध्यक्ष ॲड. विक्रम संकाये यांनी आगामी वर्षातील विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी रोटरी बुलेटिनचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल जैन आणि ज्योती स्वामी यांनी केले, तर आभार नूतन सचिव डॉ. सुधीर जाधव यांनी मानले.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande