
रत्नागिरी, 1 ऑगस्ट (हिं.स.) । रत्नागिरी नगर परिषदेच्या उद्यान विभागातील कंत्राटी कर्मचारी काशिनाथ गोताड (रा. फगर वठार) यांचे सर्पदंशामुळे निधन झाले. त्यांच्या कुटुंबाला भाजपकडून पाच लाखाची तातडीची मदत देण्यात आली.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाजवळ माडाच्या झापांची साफसफाई करत असताना काशिनाथ गोताड यांना सर्पदंश झाला. त्यानंतर त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
या घटनेची माहिती मिळताच भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा परशुराम ढेकणे तसेच भाजप रत्नागिरी शहराध्यक्ष परशुराम (दादा) ढेकणे यांनी तत्काळ या घटनेची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिली. त्याची दखल घेत चव्हाण यांनी तातडीने संबंधित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार भारतीय जनता पार्टीतर्फे ५ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी वर्षा ढेकणे यांनी दिवंगत काशिनाथ गोताड यांच्या पत्नीला धीर देत या कठीण प्रसंगी भारतीय जनता पार्टी आपल्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, अशी ग्वाही दिली. भविष्यात कोणत्याही प्रकारची शैक्षणिक गरज भासल्यास निःसंकोच कळवा. पक्षाच्या माध्यमातून शक्य ती सर्व मदत करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या प्रसंगी नगरसेवक नितीन जाधव, राजू तोडणकर, मानसी करमरकर, सुप्रिया रसाळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, भाजप जिल्हा सरचिटणीस नूपुर मुळे आदी उपस्थित होते. दिवंगत काशिनाथ गोताड यांच्या कुटुंबीयांना धीर देत त्यांच्या पाठीशी कायम उभे राहण्याचा विश्वास यावेळी सर्व उपस्थितांनी व्यक्त केला. सामाजिक बांधिलकी जपत संकटग्रस्त कुटुंबाला तातडीने मदतीचा हात देत भारतीय जनता पार्टीने संवेदनशीलतेचा परिचय दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी