
यवतमाळ 01 ऑगस्ट (हिं.स.)घाटंजी तालुक्यातील जुनोनी येथे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध असली, तरी शेड आणि तेथे जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने पावसाळ्यात अंत्यसंस्कार करणे ग्रामस्थांसाठी अडचणीचे ठरत आहे. संततधार पावसामुळे गावातील एका वृद्ध महिलेवर नियोजित पद्धतीने दाहसंस्कार करता आले नाही. अखेर पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा नेत स्मशानभूमीत दफनविधी करावा लागला.
आमडी गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणार्या जुनोनी गावाची लोकसंख्या सुमारे पाचशे आहे. गावात स्मशानभूमीसाठी स्वतंत्र जागा आहे. मात्र, त्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी शेड उभारण्यात आलेले नाही. तसेच स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी व्यवस्थित रस्ताही नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावातील भागीरथा माधव खडसंग (वय ८०) यांचे गुरुवारी (ता.३०) रोजी निधन झाले. तालुक्यात सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू होता. पाऊस थांबेल, या अपेक्षेने कुटुंबीयांनी दाहसंस्कारासाठी सरणाची लाकडेही आणली होती. मात्र, दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने अडचण निर्माण झाली. स्मशानभूमीत शेड नसल्यामुळे भरपावसात सरण रचून दाहसंस्कार करणे शक्य झाले नाही. त्यातच स्मशानभूमीकडे जाणार्!या मार्गावर पाणी साचल्याने ग्रामस्थांना पाण्यातून वाट काढत अंत्ययात्रा न्यावी लागली.
अखेर परिस्थिती लक्षात घेऊन सायंकाळी पाच वाजेदरम्यान मृतदेहावर दाहसंस्कार करण्याऐवजी स्मशानभूमीच्या जागेत दफनविधी करण्यात आला. या घटनेनंतर स्मशानभूमीतील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात अशा प्रकारची अडचण वारंवार उद्भवू नये, यासाठी स्मशानभूमीत शेड उभारण्यासह तेथे जाण्यासाठी योग्य रस्त्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी