
यवतमाळ, 01 ऑगस्ट (हिं.स.)| जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती, घरे, जनावरे आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनाची व्हीसीव्दारे तातडीची आढावा बैठक घेऊन नुकसानग्रस्तांना त्वरित मदत पोहोचविण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीत पालकमंत्री राठोड यांनी शेतपिके, जनावरे, घरे तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कोणताही विलंब न करता तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पंचनाम्याच्या आधारे पात्र लाभार्थ्यांना शासनाची मदत त्वरित मिळाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. पूरस्थिती लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि सर्व तालुका स्तरावरील कंट्रोल रूम २४ तास कार्यरत ठेवाव्यात, स्थलांतरीत नागरिकांना तत्काळ मदत पाहोचविण्याचे आदेश पालकमंत्री राठोड यांनी दिले.नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. संभाव्य धोका टाळण्यासाठी ग्रामस्तरीय दक्षता समित्यांच्या बैठका तातडीने घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
पूरग्रस्त भागातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून महसूल, कृषी, पशुसंवर्धन, ग्रामविकास आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देत नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. बैठकीस पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी