डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लेखन प्रेरणा दिन उत्साहात
छत्रपती संभाजीनगर, 01 ऑगस्ट (हिं.स.) :महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त लेखन प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत आयोजित कार्य
Q


छत्रपती संभाजीनगर, 01 ऑगस्ट (हिं.स.) :महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त लेखन प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत आयोजित कार्यक्रमांमध्ये साहित्य वाचन, व्याख्यान, शाहिरी, गीते आणि साहित्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य प्रशासकीय इमारतीत कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्यासह मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि ज्ञान स्रोत केंद्राच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे वाचन करण्यात आले.

सायंकाळी प्रख्यात साहित्यिक डॉ. सोमनाथ कदम (कणकवली) यांचे ‘अण्णाभाऊंचे साहित्य आणि त्यातील तत्त्वज्ञान’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यान झाले. ज्ञान स्रोत केंद्रातील कार्यक्रमास विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे, ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक डॉ. सुभाष चव्हाण, रासेयो संचालक डॉ. सोमीनाथ खाडे, प्र. वित्त व लेखाधिकारी डॉ. संजय कवडे, संचालक डॉ. मदनलाल सूर्यवंशी, डॉ. संजय शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

निरंतर शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अश्विन रांजणीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी डॉ. सुभाष चव्हाण यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ या प्रसिद्ध कादंबरीचा सारांश सादर केला.

या कार्यक्रमात कविता, कथा-कादंबरीतील परिच्छेद वाचन, व्याख्यान, शाहिरी आणि गीतांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये डॉ. सोमिनाथ खाडे, डॉ. विलास ईप्पर, अस्लम शेख, डॉ. ललिता गोपाळ, गणेश लोकरे, दिलीपकुमार सावतकर, अमृता आव्हाळे आदींनी सहभाग घेतला.

यावेळी नाट्यशास्त्र विभागाचे डॉ. गजानन दांडगे आणि सहकाऱ्यांनी ‘माझी मैना गावाकडे राहिली... माझ्या जीवाची होतीय काहिली’ ही प्रसिद्ध छक्कड सादर केली. तसेच अण्णाभाऊ साठे यांची पुस्तके, त्यांच्यावरील ग्रंथ आणि शोधप्रबंधांचे प्रदर्शन भरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. चक्रधर कोठी यांनी केले, तर डॉ. सतीश पद्मे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठातील विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

समाजमाध्यमावर का असेना, पण नियमित लिहा : डॉ. अंभुरे

दीड दिवसाची शाळा शिकलेले अण्णाभाऊ साठे हे उत्कृष्ट साहित्यनिर्मितीच्या माध्यमातून अजरामर झाले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा जागर करताना आजच्या युवा पिढीने समाजमाध्यमांवर का असेना, नियमित लेखन केले पाहिजे, असे आवाहन डॉ. कैलास अंभुरे यांनी केले.

वाटेगाव ते रशियापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास : डॉ. रांजणीकर

सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे जन्मलेले अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य रशियापर्यंत पोहोचले, हा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांनी समजून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. अश्विन रांजणीकर यांनी केले.

अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर नाटके, वगनाट्य आणि चित्रपटांची निर्मिती झाली असून, त्यांच्या पुस्तकांचे १४ भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande