खोट्या बातम्या पसरवू नका; सामाजिक सलोखा जपा' : धनंजय मुंडेंचे माध्यमांना आवाहन
बीड, 01 ऑगस्ट (हिं.स.)। बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर समाजमाध्यमांवर आणि काही माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या वृत्तांवर आमदार धनंजय मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जबाबदार पत्रकारिता करण्याचे आवाहन केले आहे. कोणतेही वृत्त प्रसारित करण्
धनंजय मुंडे


बीड, 01 ऑगस्ट (हिं.स.)।

बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर समाजमाध्यमांवर आणि काही माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या वृत्तांवर आमदार धनंजय मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जबाबदार पत्रकारिता करण्याचे आवाहन केले आहे. कोणतेही वृत्त प्रसारित करण्यापूर्वी त्याची शहानिशा करावी आणि चुकीच्या बातम्यांमुळे जिल्ह्यातील सामाजिक सलोखा बिघडवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

धनंजय मुंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून, बैठकीदरम्यान विरोधी पक्षातील कोणत्याही लोकप्रतिनिधीशी आपला वाद किंवा खडाजंगी झालेली नाही. राजकारणात वैचारिक मतभेद असले तरी परस्परांमध्ये संवाद आणि सौहार्द कायम असते. मात्र काही माध्यमांनी वस्तुस्थिती पडताळून न पाहता चुकीच्या बातम्या प्रसारित केल्याचा आरोप त्यांनी केला.

याशिवाय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रथमच बीडमध्ये आल्या असताना मोठ्या गर्दीत नागरिकांना शांतपणे आणि हळू आवाजात आपले प्रश्न मांडण्याची विनंती आपण केली होती. मात्र या घटनेचेही चुकीचे चित्रण करून शेतकऱ्यांना दम दिला असा विपर्यास करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बीड जिल्ह्यातील बहुतांश पत्रकार जबाबदारीने, निर्भीडपणे आणि निष्पक्षपणे काम करतात. त्यांच्या पत्रकारितेचा आपण कायम आदर करतो. मात्र काही मोजक्या पत्रकारांविषयी आर्थिक गैरव्यवहारासंदर्भातील तक्रारी पूर्वीपासून प्राप्त झाल्या असूनही, त्यांच्या भवितव्याचा विचार करून आपण वरिष्ठांकडे तक्रार केली नसल्याचेही मुंडे यांनी नमूद केले.

जिल्ह्यातील सामाजिक वातावरण पुन्हा स्थिर होत असताना चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित करून ते बिघडविण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करत धनंजय मुंडे यांनी जबाबदार माध्यमे आणि माध्यमकर्मींना वस्तुनिष्ठ पत्रकारितेची भूमिका निभावण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande