
- खासदार बजरंग सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश
बीड, १ ऑगस्ट (हिं.स.) : म्यानमारमधील म्यावाडी परिसरातील सायबर फसवणूक केंद्रांमध्ये अडकलेल्या बीड जिल्ह्यातील स्वप्नील भारत काळुंके यांच्यासह इतर भारतीय नागरिकांच्या सुरक्षित सुटकेसाठी खासदार बजरंग मनोहर सोनवणे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. भारतीय दूतावासाने या नागरिकांच्या सुटकेसाठी विशेष राजनैतिक कारवाई सुरू केल्याची माहिती अधिकृतरित्या दिली आहे.
या प्रकरणी २८ जुलै २०२६ रोजी खासदार बजरंग सोनवणे यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार निलेश लंके यांच्यासमवेत केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हा गंभीर आणि मानवीय विषय मांडला होता. तसेच परराष्ट्र मंत्रालयाकडे सविस्तर निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.
या पाठपुराव्याची दखल घेत म्यानमारमधील भारताचे राजदूत अभय ठाकूर यांनी खासदार सोनवणे यांना अधिकृत पत्राद्वारे माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील ३२ भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी म्यानमार प्रशासनाकडे स्वतंत्र 'डिप्लोमॅटिक नोट' पाठविण्यात आली असून, त्यामध्ये बीड जिल्ह्यातील स्वप्नील भारत काळुंके यांचाही समावेश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, म्यावाडी परिसर सध्या गैर-राज्य घटकांच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे बचाव मोहिमेत काही अडचणी येत आहेत. तरीही भारतीय नागरिकांची सुरक्षित सुटका करून त्यांना स्वदेशी परत आणणे हे दूतावासाचे सर्वोच्च प्राधान्य असून, त्यासाठी संबंधित यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधला जात आहे.
दूतावासाच्या आकडेवारीनुसार, जुलै २०२२ पासून आतापर्यंत २,६८३ भारतीय नागरिकांनी मदतीसाठी संपर्क साधला असून, त्यापैकी २,४१८ नागरिकांची यशस्वीरित्या सुटका करून त्यांना भारतात परत आणण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांच्या सुटकेसाठीही प्रयत्न सुरू असल्याचे दूतावासाने स्पष्ट केले आहे.----------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis