
लातूर, 01 ऑगस्ट (हिं.स.)।
जून आणि जुलै हे दोन्ही महिने बहुतांश कोरडे गेल्याने चिंतेत असलेल्या वलांडी परिसरातील शेतकऱ्यांना अखेर जुलै महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांत झालेल्या रिमझिम पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा शेतात धाव घेत पेरणीच्या कामांना वेग दिला असून परिसरात सर्वत्र कृषी कामांसाठी लगबग सुरू झाली आहे.
यावर्षी मान्सूनच्या अनियमिततेमुळे जून व जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती मशागत करून शेते पेरणीसाठी तयार ठेवली होती; मात्र पावसाअभावी पेरणी रखडली होती. काही शेतकऱ्यांनी धाडसाने केलेली पेरणी उगवण न झाल्याने किंवा उगवलेली पिके करपण्याच्या मार्गावर आल्याने चिंता वाढली होती. दरम्यान, जुलै महिन्याच्या अखेरच्या दोन दिवसांत परिसरात रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला. या पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे.
वलांडी, बोंबळी (बु.), बोंबळी (खु.), टाकळी, कोरेवाडी तसेच कर्नाटक सीमेलगतच्या आळवाई,
येलमवाडी आदी गावांतील शेतांमध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्रे वर्दळ वाढली असून शेतकरी दिवसभर पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
परिसरात प्रामुख्याने सोयाबीन,
तूर व इतर खरीप पिकांची पेरणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचे वातावरण निर्माण झाले असले तरी पुढील काही दिवस नियमित आणि समाधानकारक पाऊस होणे अत्यावश्यक असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
सध्या झालेला पाऊस पेरणीसाठी पोषक असला तरी पिकांच्या चांगल्या उगवणीसाठी सातत्याने पाऊस होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. जून-जुलै महिन्यातील दीर्घ खंडामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना अखेर निसर्गाने दिलासा दिला असून, आता सर्वांचे लक्ष पुढील पावसाकडे लागले आहे. नियमित पाऊस कायम राहिल्यास खरीप हंगामास नवसंजीवनी मिळेल आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा उंचावतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis