
सोलापूर, 01 ऑगस्ट (हिं.स.)। राजमाता अहिल्यादेवी होळकर (लेडी डफरिन) हॉस्पिटलमध्ये गरोदर महिलांव्यतिरिक्त इतर रुग्णांसाठीही जनरल सोनोग्राफी सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक सीए. विनोद धर्मा भोसले आणि भाजप मंडल अध्यक्ष नागेश खरात यांनी संयुक्त निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.
सध्या रुग्णालयात केवळ गरोदर महिलांसाठी सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे इतर सर्वसामान्य, ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन सोनोग्राफी करावी लागत असून त्यासाठी अतिरिक्त आर्थिक खर्च करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. रुग्णांच्या सोयीसाठी आवश्यक डॉक्टर, तंत्रज्ञ आणि इतर सुविधा उपलब्ध करून जनरल सोनोग्राफी सेवा तातडीने सुरू करावी, जेणेकरून परिसरातील नागरिकांना परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा स्थानिक स्तरावर मिळू शकेल, अशी मागणी करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त सचिन ओंबासे आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत लवकरच ही सुविधा सुरू करण्याबाबत प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. निवेदनावेळी शाहू महाराज सलगर, श्रीकांत गायकवाड आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड