
पुणे, 0१ ऑगस्ट (हिं.स.) : लोकमान्य टिळक यांच्या १०६व्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' यंदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला. मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूल मैदानावर झालेल्या भव्य सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित डोवाल यांच्या राष्ट्रीय सुरक्षेतील योगदानाचा गौरव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेसाठी नवी रणनीती विकसित केली. भारत आता केवळ मार सहन करणारा देश राहिलेला नाही, तर गरज पडल्यास शत्रूच्या भूमीत घुसून प्रत्युत्तर देणारा देश बनला आहे, असे त्यांनी सांगितले.
फडणवीस यांनी अजित डोवाल यांनी संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठी समर्पित करत राष्ट्रीय सुरक्षेला नवी दिशा दिल्याचे नमूद केले. एका धुरंधराला पुरस्कार देण्यासाठी दुसरे धुरंधर आले आहेत. राष्ट्रीय चाणक्यांना पुरस्कार देण्यासाठी राजकीय चाणक्य उपस्थित आहेत, अशा शब्दांत त्यांनी अमित शाह आणि अजित डोवाल यांचा गौरव केला.
अजित डोवाल हे दूरदृष्टी, परखड निर्णयक्षमता आणि रणनीतीतील कौशल्यासाठी ओळखले जातात. जिंकलो तर इतिहास घडतो आणि हरलो तर इतिहासजमा होतो, या विचारसरणीने त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु